नांदूरवैद्य : जिल्ह्यात आधीच कोरोना संकटाने जनता कावलेली असताना त्यात भर उन्हाळ्यात पाणीटंचाईची धग जाणवू लागल्याने घोटभर पाण्यासाठी तडफड सुरू आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मायदरा-धानोशी ग्रामपंचायत हद्दीतील ठोकळवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातान्हात दहा ते बारा किलोमीटर पायपीट करावी लागते. याहीवर्षी येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
कोरोनाच्या संचारबंदीत आधीच हतबल होऊन बेरोजगार झालेले शेतकरी, मजूर आता पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मायदरा-धानोशी येथील जवळपास अंदाजे साठ-सत्तर कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील महिलांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावरून पाणी मिळेल तिथे जावून घेऊन यावे लागते. यासाठी मैलोन् मैल प्रवास करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाने व विद्यमान जिल्हा परिषद सदस्याने ठोकळवाडीत पाण्यासाठी दोन हातपंप दिले, परंतु त्या हातपंपांनीही पूर्ण तळ गाठल्याने एकाच हातपंपावर संपूर्ण ठोकळवाडीतील ग्रामस्थ नंबर लावून पाणी भरतात. या हातपंपावर दर अर्ध्या तासाला एक हंडाभर पाणी मिळत आहे. एकमेव पर्याय पण त्यालाही पाणी नसल्याने दिवस-रात्र हा हातपंप सुरु असतो. दरवर्षी उन्हाळ्याचे चार-पाच महिने ठोकळवाडीतील महिलांना कायमस्वरूपी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हा क्रम वर्षानुवर्षे सुरू आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी पाईपलाईनने पाणी द्यावे, अशी मागणी कुसुम मुंडे, तुळसाबाई करवंदे, देवराम मुंडे, रंगनाथ मुंडे, मधुकर मुंडे, जालिंदर करवंदे, नंदा करवंदे, सावित्री करवंदे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
कोट....
दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र एकमेव असलेल्या हातपंपावर नंबर लावून वेळ खर्च करून रात्री-अपरात्री जीव धोक्यात घालत पाणी भरावे लागते आहे. एक तासात दोन हंडे पाणी मिळत असल्याने शेतातील तसेच घरातील इतर कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही.
- कुसुम मुंडे, ग्रामस्थ, ठोकळवाडी
दरवर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. यंदा टँकरचेसुद्धा पाणी मिळत नाही. बोअरवेलला पाणी नसल्याने सर्व ग्रामस्थांना दूर अंतरावर पाण्याच्या शोधात जावे लागत आहे. माणसांनाच पाणी मिळत नसल्याने मुक्या जनावरांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीने पाईपलाईन करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवावा, ही अपेक्षा आहे.
- जालिंदर करवंदे, ग्रामस्थ
फोटो- ३० इगतपुरी वॉटर-१/२
ठोकळवाडीतील एकमेव हातपंपावर पाण्यासाठी नंबर म्हणून ग्रामस्थांनी ठेवलेले रिकामे हंडे तर दुसऱ्या छायाचित्रात दूर अंतरावरून पाणी आणणाऱ्या महिला.
===Photopath===
300421\30nsk_12_30042021_13.jpg~300421\30nsk_13_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० इगतपुरी वॉटर-१/२ठोकळवाडीतील एकमेव हातपंपावर पाण्यासाठी नंबर म्हणून ग्रामस्थांनी ठेवलेले रिकामे हंडे. तर दुसऱ्या छायाचित्रात दूर अंतरावरून पाणी आणणाऱ्या महिला. ~फोटो- ३० इगतपुरी वॉटर-१/२ठोकळवाडीतील एकमेव हातपंपावर पाण्यासाठी नंबर म्हणून ग्रामस्थांनी ठेवलेले रिकामे हंडे. तर दुसऱ्या छायाचित्रात दूर अंतरावरून पाणी आणणाऱ्या महिला.