मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावून गेला आहे. एकीकडे कोरोनामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी पडल्याने शेतकरी वर्गाची त्रेधा उडाली होती.मानोरी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा लागवड झालेली असताना ऐन कांदे काढणी सुरू असताना शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांद्याच्या पोळी झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत होते. त्यात वादळी वारेदेखील जोरात वाहत असल्याने कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. त्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात येत असल्याने कांदे विक्रीची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.बाजारात कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी कमी होत असल्याने शेतकरी वर्गाची कांदा साठवणुकीवर अधिक प्रमाणात भर देत असल्याचे दिसून आले आहे. त्यात नवीन कांदा चाळ तयार करण्याचे काम सुरू असल्याने तात्पुरता काढलेला उन्हाळ कांदा काढून शेतातच साठवून ठेवत असल्याचे दिसून आले आहे.चाकीसाठी भटकंतीलॉकडाऊनमुळे हार्डवेअर दुकानांची वेळ ही केवळ चार तासांसाठी उघडी असल्याने कांदा चाकीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे नव्या कांदा चाळीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत देखील कमालीची वाढ झाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.ताडपत्री, कागदांची समस्यालॉकडाऊनमुळे प्रशासनाने दुकानांची वेळ ही सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा पीक झाकण्यासाठी ताडपत्री कागदांची शोधाशोध करण्याची वेळ आली. दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांकडून कागद आणून आपले कांदे झाकण्याची नामुष्की ओढावली होती.
(२९ मानोरी, १)पावसामुळे साठवून ठेवलेला कांदा काळा पडला आहे.कांदा साठवणुकीसाठी नवीन चाळ तयार करताना शेतकरी.