लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : थकबाकीदार नसतांनाही महावितरणचे कर्मचारी औद्योगिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उद्योजक आर्थिक मंदीचा सामना करता करता नाकी नऊ आलेले आहेत. त्यात महावितरण नाहक त्रास देत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत उद्योजक असतांना महावितरण कंपनीचे कर्मचारी थकबाकीदार नसतांनाही विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी देत आहेत. वीज देयक आल्यानंतर मुदतीत देयक भरले नाही तर दंड आकारणी केली जाते. हा नियम आहे. पहिले देयक आल्यानंतर जोपर्यंत दुसरे देयक दिले जात नाही तोपर्यंत त्या ग्राहकास थकबाकीदार म्हणता येत नसल्याचे औद्योगिक ग्राहकांचे म्हणणे आहे. परंतु देयकाची मुदत संपल्यानंतर लगेच थकबाकीदार घोषित करणे चुकीचे आहे. दंड भरण्याची तयारी असतांना विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि ग्राहकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.