नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील भूखंड खासगीकरणातून विकसित करून घेण्याच्या प्रकरणात आता शरणपूर रोडवरील जलधारा वसाहतीतील नियोजित जलकुंभाप्रमाणे पंचवटीतील जलकुंभावरही संकट कोसळणार आहे. जुने पंचवटी विभागीय कार्यालय असलेल्या ठिकाणी गाळे उभे आहेत. तसेच भांडाराजवळच आता जलकुंभ बांधण्याचे घाटत असतानाच हा भूखंड विकासकाला देण्याच्या यादीत असल्याने जलकुंभाचे काय करणार आणि येथील गाळ्यांचे काय करणार, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शहरातील महापालिकेच्या मालकीचे मेाक्याचे भूखंड विकासकांना देऊन विकसित करण्याचा सत्तारूढ भाजपाचा प्रस्ताव आहे. प्रशासनाचा कोणताही प्रस्ताव आणि संमती न घेताच त्यासाठी भूखंड ठरवण्यात आले असून त्या भूखंडाची स्थिती काय आहे, त्यात सध्या किंवा प्रस्तावित प्रकल्पावर कार्यवाही सुरू आहे काय, स्थानिक नगरसेवकांची काय इच्छा आहे, याचा विचार न करता भूखंड बीओटीवर देण्याची घाई करण्यात आली असून प्रशासनाने त्यावर मौन बाळगले आहे.
शरणपूर पालिका मार्केटजवळ जलधारा वसाहतीच्या जागेत ८ कोटी रुपयांचे जलंकुभ बांधण्यात येणार आहे. तसेच पश्चिम विभागाचे पाणी पुरवठा कार्यालयदेखील बांधण्यात येत आहेत. एकीकडे कोट्यवधी रुपयांची कामे होत असताना त्यावरच ही जागा बिल्डर्सला देण्याचे घाटत आहे त्यामुळे या भागातील नगरसेवक बुचकळ्यात पडलो आहेत असाच प्रकार पंचवटीतील जुन्या विभागीय कार्यालयाच्या बाबतीत घडणार आहे.
पंचवटी विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी तळावर गाळे असून तेथे दुकानदार अधिकृतरीत्या व्यवसाय करीत आहेत, शिवाय महापालिकेचा भांडार विभाग आहेत. महत्त्वाचे म्हणजे याच ठिकाणी परिसरासाठी जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना आता ते बंद ठेवायचे की तोडून टाकायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्फो...
महापालिकेच्या महासभेत विनाचर्चा प्रस्ताव घुसवण्यात आल्यानंतर भूखंड निवडीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची सहीदेखील घेण्यात आली आहे; परंतु आता असे एकेक प्रकार बाहेर पडू लागल्याने अभियंते धास्तावले आहेत.