नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाउनचा फटका शासकीय कामांसोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात राबविण्यात येत असलेल्या टीपी स्कीमलाही बसला आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीम म्हणजेच नगररचना योजनेचा आराखडा येत्या जून महिन्यात जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, सध्या सर्वच कामे ठप्प झाल्याने जूनमध्ये आराखडा जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन असून, त्यामुळे उद्योगधंदे बंद पडले असून, शासकीय कामकाजावरही परिणाम झाला आहे. महापालिकेची आणि स्मार्ट सिटीची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली आहेत. स्मार्ट सिटी कंपनीचे गावठाण विकास प्रकल्प आणि प्रोजेक्ट गोदा ही दोन मोठी कामे थांबली आहेत. मात्र त्यापलीकडे जाऊन मखमलाबाद आणि हनुमानवाडी येथील ७५३ एकर क्षेत्रातील नगररचना योजनेचे काम रखडले आहे. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांत मतभेद आहेत. समर्थक शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी अर्टी-शर्तीवर सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली होती. तर दुसºया गटाने योजनेच्या प्रत्येक सादरीकरणाच्या वेळी विरोध केला होता. या शेतकºयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करतानाच महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी तसेच महापालिका आयुक्तांना प्रकल्प राबवण्यास विरोध असल्याचे निवेदन दिले होते. हा प्रकल्प म्हसरूळ-आडगाव रोडवर स्थलांतरित करावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, महासभेतील टीपी स्कीमसाठी इरादा घोषित करण्याचा ठराव केल्यानंतर शासन राजपत्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रारूप टीपी स्कीमचे महापालिकेच्या कालिदास कलामंदिरात ४ जानेवारीस सादरीकरण करण्यात आले. त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. गेल्या महिन्यात हा आराखडा नगररचना संचालकांना सादर करण्यात आला. मात्र, कोरोनाचे संकट उभे राहिले आणि प्रारूप टीपी स्कीमला मान्यता देण्याबरोबरच पुढील कार्यवाही रखडली. त्यामुळे जून महिन्यात अंतिम टीपी स्कीम जाहीर करण्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘स्मार्ट’च्या टीपी स्कीमलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 9:12 PM