लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रम अंतर्गत १० लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले.
साहित्य संमेलनासाठी निधी कमी पडू नये यासाठी स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी १० लाखांचा निधी हा स्थानिक आमदार निधी कार्यक्रमातून देत असल्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन निधी तत्काळ वितरित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. डॉ.गोऱ्हे यांना साहित्याचा खूप मोठा वारसा लाभला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून उरल्या कहाण्या या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्रेष्ठता पारितोषिक मिळाले आहे. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी ,शाश्वत विकास उद्दिष्टे व स्त्री पुरुष समानता अशी पंधरावर काही पुस्तके त्यांनी स्वत: लिहिली आहेत व अनेक संपादित केली आहेत.
इन्फो
अनोखा त्रिवेणी संगम
नाशिकचे आणि डॉ.गोऱ्हे यांचे खूप दृढ संबंध आहेत. त्यांचे वडील डॉ. दिवाकर गोऱ्हे यांचे व गोऱ्हे परिवाराचे मूळ गाव नाशिक असून चांदवडची रेणुका देवी हे त्यांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे आमदार विकास निधीचा साहित्य संमेलनासाठी उपयोग व तोही नाशिकच्या संमेलनासाठी करता येणे हा एक त्रिवेणी संगम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.