नाशिक : जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन बेड मिळणे दुरपास्त झाले असून रेमडेसिविरसाठी खासगी रुग्णालयांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच लससाठीदेखील काही केंद्रांवर थांबण्याची वेळ नागरिकांवर आल्याने नाशिकमधील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर पोहोचल्याचे जाणवू लागले आहे.
जिल्ह्यात रुग्णांना गत आठवड्यापासूनच ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता तर शासकीयच नव्हे, खासगी रुग्णालयांमध्येदेखील ऑक्सिजन बेड मिळणे जवळपास दुरपास्त झाले आहे. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम आहे. रुग्णांना प्रचंड ओळखपाळख काढून किंवा रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत रुग्णाला दाखल करून घेण्यावाचून संबंधितांच्या कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नाही. रुग्ण आणि कुटुंबीय सर्व रुग्णालयांकडे अक्षरश: गयावया करीत ऑक्सिजन बेडची तसेच रेमडेसिविरची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
रेमडेसिविरसाठी तीन-चार दिवस प्रतीक्षा
जिल्ह्यात शासनाच्या अन्न-औषध विभागाकडून रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे थेट रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्य स्तरावरच रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील अन्न-औषध विभागालाच पुरेसा पुरवठा होत नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना रेमडेसिविरसाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गत आठवड्यात तर रेमडेसिविरसाठी आंदोलन करण्याची वेळ नागरिकांवर आली होती. मात्र, त्यानंतरही अद्याप सर्व रुग्णालयांना रेमडेसिविरचा सुरळीत पुरवठाच होऊ शकलेला नाही. अतिगंभीर रुग्णांसाठी जीवरक्षक प्रणाली म्हणून व्हेंटिलेटरचा उपयोग केला जातो. जिल्ह्यात सर्वाधिक ८० व्हेंटिलेटर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. तर मनपा आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण मिळून ४७० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, अतिगंभीर रुग्णांची संख्याच प्रचंड प्रमाणात वाढल्याने हे व्हेंटिलेटरदेखील अपुरे पडले आहेत.
इन्फो
मागणी ७० टन; पुरवठा ५४ टन
अनेक रुग्णांसाठी दिवस-दिवस प्रयत्न करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनविना जीव गमावण्याची वेळ येऊ लागल्याने कठोरातील कठोर उपाययोजनांची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बाधित नागरिकांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावाधाव होत आहे. तसेच धावाधाव करूनही ऑक्सिजन बेड किंवा ऑक्सिजन उपलब्ध हाेत नसल्याचे भयावह चित्र नाशिक शहरात सध्या दिसत आहे. त्यामुळे कोरोना होणे हे जिवावरील संकट ठरू लागले आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठे संपुष्टात येण्याची वेळ आल्यानंतरही त्यांना खासगी पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकत नसल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांना दिवसाला किमान ७० केएल ऑक्सिजनची गरज असून त्यापैकी ५२ ते ५५ केएल ऑक्सिजनचा पुरवठा कंत्राटदारांकडून होत आहे. मुरबाड, चाकणच्या प्रकल्पातून ऑक्सिजन मिळण्यासच विलंब हाेत असल्याने ऑक्सिजन मिळणे खासगी रुग्णालयांना प्रचंड जिकिरीचे झाले आहे. मनपाची बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाकडे स्वत:चे ऑक्सिजन प्लांट असले तरी ते पुरे पडत नसल्याने त्यांनादेखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रचंड मुश्कील झाले आहे. तर शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असला तरी बेड उपलब्ध नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
इन्फो
लसीकरणासाठी प्रतीक्षा
जिल्ह्यात गत महिन्यापासून दोन -तीन वेळा काही केंद्रांवरील लसींचा साठा संपल्याचे प्रकार घडले. त्यानंतर गत महिन्याच्या अखेरीस १ लाख ९० हजार लसींचा पुरवठा झाल्याने काही काळ लसीकरण सुरळीत चालले. मात्र, त्या लसी गत आठवड्याच्या अखेरीस संपुष्टात येऊनही नवीन लस प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे काही केंद्रांवर नागरिकांना लसीसाठीदेखील प्रतीक्षा करावी लागली. मात्र, त्यानंतर ४६ हजार लसींचा पुरवठा झाल्याने गत चार दिवसांपासून लसीकरण सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, पुढील लसींचा साठा केव्हा मिळणार ते प्रशासनालाच माहिती नाही.