महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी (दि.२३) वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
गेल्यावर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात अनेक उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. त्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलरबरोबरच ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळले होते. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजन पुरवठा करताना तत्काळ टँकर आले नाही तर किमान रुग्णालयांना काही दिवस दिलासा देता येईल, या दृष्टीने झाकीर हुसेन रूग्णालयात १३ तर बिटको रुग्णालयात २१ केएल ऑक्सिजन टाक्या बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातील झाकीर हुसेन रुग्णालयातील टाकी तर ३१ मार्च राेजीच बसविण्यात आली होती. या टाकीच्या पाईपलाईनची गळती सुरू झाल्यानंतर महापालिकेने रुग्णालयात असलेले काही सिलिंडर रुग्णांना देण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपुरे पडले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातून आणलेले पंधरा जम्बो गॅस सिलिंडरदेखील पुरवले परंतु उपयोग झाला नाही. तोपर्यंत २२ रुग्णांच्या प्राणावर बेतले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. २२) रात्री भुजबळ फार्म येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पुन्हा एकदा झाकीर हुसेन रुग्णालयाच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यात आला. याठिकाणी पर्यायी ऑक्सिजन व्यवस्था नव्हती हे स्पष्ट झाल्यानंतर भुजबळ यांनी रुग्णालयात अशाप्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर महापालिकेने आता दोन्ही रुग्णालयात तीन तीन केएलच्या पर्यायी टाक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो...
महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये दोन पर्यायी टाक्या तीन केएलच्या असतील. सध्याच्या टाक्या आणि त्याला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या या टाक्या यातून आलटून-पालटून ऑक्सिजन रुग्णांना दिला जाईल. एखादी दुर्घटना घडलीच तर किमान एकातरी टाकीमधील ऑक्सिजनमधूुन रुग्णांचे प्राण वाचू शकतील.