नाशिक रोड : कोरोनाच्या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाने सध्या सर्व रेल्वे कोविड व फेस्टिव्हल स्पेशल या नावाने सुरू ठेवल्याने रेल्वे प्रवाशांकडून तत्काळचे जादा तिकीट दर आकारणी करून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. तसेच जनरलचे डबे बंद करून त्याऐवजी द्वितीय श्रेणी, जनरल असे बसण्याचे आरक्षण तिकीट प्रवाशांना जादा पैसे देऊन द्यावे लागत आहे. एक प्रकारे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांबरोबरच जनरल तिकीट बंदच करून टाकले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रवासी वाहतूक करणारी रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येऊन जवळपास सर्वच रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचे कारण सांगितले जात असले तरी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर दर्जाच्या गाड्या व सर्वसाधारण तिकीट बंद करून ठेवले आहे. आता फक्त कोविड व फेस्टिव्हल स्पेशल या नावाने सर्व रेल्वे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सर्व स्पेशल रेल्वे गाड्यांचे क्रमांक शून्य क्रमांकाने सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पूर्वी जी पुष्पक रेल्वे होती. तिच्या क्रमांकाच्या पूर्वी शून्य लावून तिला आता मुंबई लखनौ-एक्स्प्रेस नावाने पुकारले जात आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण तिकीट बंदच ठेवण्यात आले असून, कन्फर्म आरक्षण तिकिटाशिवाय कोणीही प्रवास करू शकत नाही.
ज्या प्रवाशाचे वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल, त्या प्रवाशाने तो ज्या रेल्वेस्थानकावरून बसणार आहे, त्या रेल्वेस्थानकावर संबंधित रेल्वे तिच्या निर्धारित येण्याच्या अगोदर किमान काही मिनिटे अगोदर आपले वेटिंगमधील आरक्षण तिकीट रद्द केले तर त्याला पैसे मिळतात. त्यानंतर तिकीट रद्द केले तर पैसे मिळत नाहीत.
-------
सर्वसाधारण डबे बंद
रेल्वेमध्ये सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी असलेले सर्वसाधारण तिकिटाचे डबे रेल्वे प्रशासनाने प्रवासासाठी बंद करून ठेवले आहेत. त्याऐवजी प्रवाशांना द्वितीय श्रेणी जनरल बसण्याचे आरक्षण तिकीट काढावे लागते. त्यामुळे यापूर्वी ज्या प्रवाशाला पंधरा रुपयांमध्ये सर्वसाधारण तिकिटाचा खर्च येत होता. आता त्याच ठिकाणी किमान साठ रुपये मोजावे लागत आहेत.
------
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
* रेल्वे प्रशासनाने फेस्टिव्हल व कोविड स्पेशल रेल्वेंना कन्फर्म आरक्षण तिकीट हे तत्काळच्या दराने काढावे लागते.
* पूर्वीची एक्स्प्रेस रेल्वे आता सुपरफास्ट व फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे या सर्व गाड्यांचे आरक्षण तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे.
* पुष्पक एक्स्प्रेसने नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून कल्याणपर्यंतचे आरक्षण तिकीट १२० रुपयांत काढले जात होते. आता सुपरफास्टला १४० रुपये लागत असून, फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेला २३० रुपये मोजावे लागत आहेत.
-------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
* पंचवटी एक्स्प्रेस
* राज्यराणी एक्स्प्रेस
* तपोवन एक्स्प्रेस
* मंगला एक्स्प्रेस
* जनशताब्दी एक्स्प्रेस
-------
स्पेशल भाडे कसे परवडणार?
कोरोनाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाची मनमानी व बाबूगिरी चालू झाली आहे. गोरगरिबांनी साधारण तिकीट न काढता द्वितीय श्रेणी जनरल आरक्षण तिकीट काढूनच जादा पैसे देऊन प्रवास करावा, अशी रेल्वेने भूमिका घेतलेली आहे.
- संभाजी रत्नपारखी, प्रवासी
---------
रेल्वेमध्ये कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवास करता येतच नाही. द्वितीय श्रेणी जनरल बसण्याचे आरक्षण तिकीट काढणारे हे अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब प्रवासी असतात. त्यांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, याकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही.
- किशोर बोराडे, प्रवासी.