नाशिक : कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय परिसरात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या परिसरातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
क्लासेसला परवानगी मिळाल्याने दिलासा
नाशिक : खासगी क्लास सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. मागील ९ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून क्लास करावा लागत आहे. क्लास सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात दिवसागणिक सोनसाखळी ओढण्याबरोबरच मोबाइल चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे
नाशिक : शहरातील विविध मार्गांवर पुन्हा अतिक्रमणे वाढू लागली असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताेच, शिवाय पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने ही अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
भद्रकाली, दूधबाजारात वाहतूक कोंडी
नाशिक : भद्रकाली, दूधबाजार परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या भागात सतत वाहनांची वर्दळ असते. अरुंद रस्त्यांवरच उभे राहणारे, विविध वस्तू विकणारे विक्रेते आणि दुकानांसमोर उभी करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त
नाशिक : शहरालगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढीव मतदानाचा फायदा कुणाला होणार, याबाबतची गणिते कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहेत.