सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व मातोश्री चं. व अ. चांडक कन्या विद्यालयात १९९२ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनी २८ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला. प्रारंभी सारडा विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार, चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक माधवी पंडित, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उद्योजिका कांचन कर्पे, किरण भणगे, सोनाली पवार, प्रा. संतोष जाधव, रूपाली पाटसकर यांच्या हस्ते सरस्वतीपूजन संपन्न झाले. याप्रसंगी योगेश पवार,धनंजय खर्डे, प्रीती गुजराथी, केतन सोनार, योगेश मालपाठक, आरती तटाने, संजय विशे, कविता पानसरे, स्विटी शहा, नीता शहा, शिल्पा बिचवे आदींसह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कलाशिक्षक राहुल मुळे यांनी सूत्रसंचालन केले.
सारडा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:53 PM