नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी गावाजवळील हरिहर गडावर येत्या रविवारपर्यंत (दि.१७) जाण्यास पश्चिम वनविभागाने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश उपवनसंरक्षकांकडून काढण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात होणाऱ्या प्रचंड जोरदार पावसामुळे गडाची वाट निसरडी होऊन धोकादायक बनली आहे. यामुळे पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी हरिहरगडाची निवड करू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे. पावसाळ्यात या गडावर चढाई करणे अत्यंत धोकादायक ठरते. कातळकोरीव पायऱ्यांवरून पावसाचे धो-धो पाणी वाहत आहे. यामुळे शेवाळ तयार होऊ लागले आहे. यामुळे या पायऱ्या निसरड्या बनल्या आहेत. पायऱ्या खूपच लहान आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गडाची वाट बिकट होऊन जाते. परिणामी मोठी दुर्घटनाही गडावर घडू शकते, असे वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे शक्यतो प्रशिक्षित गिर्यारोहकसुद्धा हरिहरवर जाणे पावसाळ्यात टाळतात. यामुळे सर्वसामान्य तरुणांनी या गडावर जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाशिक शहरापासून ५५ तर त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या २० ते २२ किलोमीटर अंतरावर हरिहर गड आहे. या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. मात्र, गडाची चढाई करण्याचा मोह टाळलेलाच बरा, असे गिरीदुर्गप्रेमी व गिर्यारोहक युगंधर पवार यांनी सांगितले. गडावर न जाता आजूबाजूचा निसर्गाने नटलेला परिसर न्याहाळतानाही नैसर्गिक सुखाची अनुभूती सहजरित्या होते. यामुळे या भागात पर्यटकांनी पावसाळ्यात भेट द्यावी; मात्र हरिहर गडावर जाणे टाळावे, असे गिरीदुर्गप्रेमींसह निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.
पर्यटकांच्या रेलचेलीमुळे हर्षवाडी गावातील आदिवासींना हंगामी रोजगारदेखील प्राप्त होतो. या भागात वर्षा सहलीला जाताना पर्यटकांनी परिसरात कुठल्याही प्रकारच्या साउंडसिस्टीमचा वापर करू नये, तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपला कचरा आपणच स्वत: पुन्हा सोबत घेऊन जावा. निसर्गात कोठेही अस्वच्छता पसरणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे.
पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट!
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या प्रदेशासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट गुरुवारपर्यंत व पुढे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे हरिहर गडावर रविवारपर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.