सिडको : अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेच्या एका इमारतीच्या वाहनतळावर लावण्यात आलेल्या चार दुचाकींनी अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी सदरच्या गाड्या ह्या अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्या असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. अंबड भागातील चुंचाळे शिवारात महापालिकेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आली आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असून, गुन्हेगारीदेखील वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. एका इमारतीच्या वाहनतळात लावण्यात आलेल्या एका दुचाकीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला. या घटनेत शेजारी उभ्या असलेल्या तीन दुचाकींनीही पेट घेतला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. दुचाकींनी पेट घेतल्याचे समजताच इमारतीतील नागरिकांनी धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.आग कोणत्या कारणामुळे लागली यासाठी फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. सदरच्या दुचाकी अज्ञात व्यक्तींनी दहशत पसरविण्याच्या हेतूने जाळल्या असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.फॉरेन्सिक अधिकारी दाखलयाबाबत पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले, घरकुल परिसरात मध्यरात्री दुचाकीला लागलेल्या आगीबाबत फॉरेन्सिक अधिकाºयांना पाचारण करण्यात आले होते. सदरची आग ही दुचाकीच्या बिघाडामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी आग लागली की लावली गेली याचा तपास केला जाईल, असे तांबे यांनी सांगितले.