सिडको : अंबड येथे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरला वाहनात डांबून निर्जन ठिकाणी घेऊन जात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदल बुद्धिमान सिंग (३७, रा. दत्तनगर, अंबड) हे मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. औद्योगिक वसाहतीत एसआर फायबर ग्लास कंपनीत ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करतात. याअगोदार या कंपनीमध्ये धनंजय सिंग नामक लेबर कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी इंदल यास फोन करून मारु ती संकुलजवळील एका दुकानजवळ बोलावून घेत, ‘तू या कंपनीमध्ये परत काम करायचे नाही’ असा दम भरला. तसेच हातातल्या लोखंडी सळीने इंदल यास मारहाण केली. यावेळी सिंग यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार लोकांनीही त्यांच्यावर कमरेचा पट्टा काढून हल्ला चढविला. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून इंदल यांना निर्जन ठिकाणी घेऊन जात सिंग यांच्या भाच्याने बुद्धिमान यास गोळी मारून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. इंदल यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत घडलेल्या प्रकाराची माहिती कंपनीच्या मालकांना दिली. या मारहाणीत इंदल सिंग हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.व्यावसायिक, उद्योजकांमध्ये नाराजीअंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून हाणामारी, भुरट्या चोऱ्या, लुटालूट, टवाळखोरांचा उपद्रव असे प्रकार वाढल्याने उद्योजक व व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे़
अंबडला व्यावसायिक कारणातून ठेकेदारास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:37 AM