सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतून महापालिकेस मोठ्या प्रमाणात कर रूपाने उत्पन्न मिळत असले तरी त्या बदलयात मूलभूत सुविधा मात्र दिल्या जात नाही. पावसामुळे वसाहतीतील रस्त्यांची चाळण झाली असून, येथील बहुतांशी वीज दिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांकडून कामगारांची लूटमार करून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहे. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास अंबड औद्योगिक वसाहतीतून घरपट्टी व पाणीपट्टीसह इतर कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते, परंतु त्या बदल्यात मनपाकडून सुविधा मिळत नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील बहुतांशी रस्ते खराब झाले असून, या रस्त्यातून मार्ग काढताना कामगारांना कसरत करावी लागत आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधीच आयमाच्या वतीने नूतन अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. यात पावसाळ्यापूर्वी येथील रस्ते तसेच बंद पथदीप यांसह विविध विषयांवर चर्चा होऊन ते मार्गी लावण्याचे आश्वासनही मनपाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु एम.आय.डी.सी.ची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र बघावयास मिळत असून, याबाबत मनपा दखल घेत खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्थ करण्याची अपेक्षाही कामगारांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच एम.आय.डी.सी. भागातील अनेक पथदीपही बंद असल्याने कामगारांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे. अनेकदा कामगारांना रस्त्यातच अढवून त्यांच्याकडील रोकड, मोबाइल हिसकावून कामगारांना मारहाण करण्याचा प्रकारही चोरट्यांकडून केला जात आहे. याबाबत मनपा प्रशासनाने दखल घेऊन बंद असलेले पथदीप त्वरित दुरुस्त करण्याची मागणीही उद्योजक व कामगार वर्गाकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
अंबड एमआयडीसी अंधार
By admin | Published: August 26, 2016 12:18 AM