सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२१) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व मोबाइलची चोरी करून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्रकार मागील आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील राणाप्रताप चौकात घडला असतानाच मंगळवारी (दि.२१) पुन्हा पहाटेच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर भागात अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे सिडकोसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वामी विवेकानंद भागात महावीर लुनावत यांचे रामा एजन्सी हे दुकान असून, ते दुकानाच्या मागेच राहतात. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर मंगळवारी सकाळी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोरट्यांनी लुनावत यांच्या घराच्या दरवाजाची कडी लावत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली. तर याच परिसरात असलेल्या अजित आचलिया यांचे न्यू विशाल ट्रेडर्स दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून सुमारे दहा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. यानंतर चोरटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी मानसी जनरल या दुकानातील हजार ते बाराशे रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैदपहाटेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी स्वामी विवेकानंदनगर भागातील तीन दुकाने फोडून हजारो रुपयांच्या रोकडची चोरी केली. या चोरट्यांनी त्यानंतर आधार मेडिकलकडे आपला मोर्चा वळविला. तिघे चोरटे चोरी करताना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असले तरी चोरट्यांना पकडण्यात यशस्वी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.हाकेच्या अंतरावरच चोरीअंबड पोलीस ठाण्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वामी विवेकानंदनगर भागात चोरट्यांनी मध्यरात्री दुकाने फोडून रोकड लंपास करण्याचा प्रकार घडलेला असताना रात्रीच्या सुमारास गस्त घालणाºया पोलिसांना हा प्रकार लक्षात आला नसल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे व्यापारी तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर तीन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:39 AM