नाशिक: राज्यातील सरकारी रूग्णालयांमधील विदारक स्थिती समोर येत असतांनाच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयाला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी औषध खरेदीला होणाऱ्या विलंबाबत नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील आयसीयू आणि कुंभमेळा वॉर्डाला भेट देत पाहाणी केली.
राज्यातील रूग्णालयांमधील मोफत उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याने सरकारी रूग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे आरेाग्य व्यवस्था कोलमडली असल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी जिल्हा रूग्णालयाची पाहाणी केली. दानवे येणार असल्याने रूग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. रूग्णलायातील स्वच्छता तातडीने करण्यात आली तर अनेक ठिकाणी पडदे पदलण्यात आले. रूग्णालय परिसरातील देखील स्वच्छता करण्यात आली.
दानवे यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल होताच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडून येथील आरेाग्य व्यवस्थेची माहिती घेतली. जिल्हा रूग्णालयातील रूग्ण संख्या, बेड संख्या, दररोजचे रूग्ण आणि सध्या उपलब्ध असलेल्या औषधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील आयसीयुला भेट देत तेथील कामकाजाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी रूग्णांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. रूग्णालयामागील कुंभमेळा वॉर्डाची पाहाणी केली यावेळी त्यांनी प्रलंबित कामे आणि रखडलेल्या कामांबाबात प्रशासनाला विचारणा केली.