पांडाणे : उन्हाळ्यात चिमणीपाखरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी दिंडोरी तालुक्यातील अंबानेर जिल्हा परिषदेतील शाळेने आवारात दाणा-पाण्याची सोय केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांवरही प्राणीमात्रांवर दयाभाव दाखविण्याच्या संस्काराचे प्रात्यक्षिकच घडविले जात असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.उन्हाळा सुरू झाला की, पाण्याची चिंता भेडसावू लागते. विशेषत: ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलावर्गाला मैलोन्मैल पायपीट करावी लागते. मनुष्यप्राण्याबरोबरच पाण्यासाठी पक्षी-प्राण्यांचीही वणवण होते. त्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील अंबानेर येथील जिल्हा परिषद शाळेने आपल्या आवारातील झाडांवर चिमणीपाखरांसाठी दाणा-पाण्याची सोय केलेली आहे. विद्यार्थ्यांनी रिकाम्या बाटल्या कापून त्यामध्ये पाणी ठेवले असून काही बाटल्यांमध्ये खाऊ ठेवला जात आहे. चिमणीपाखरांना दाणा-पाणी रोज मिळावा यासाठी विद्यार्थी त्यासंदर्भात जातीने काळजी घेत असतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासून प्राणिमात्रांवर दया करण्यासंदर्भात नैतिक मूल्य रु जविले जात आहेत. लहानपणापासूनच भूतदया हे गुण रु जविले तर निश्चितच विद्यार्थ्यांमधून एक आदर्श नागरिक निर्माण होऊ शकतो. यासाठी हा उपक्र म राबविण्यात येत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक कैलास पवार यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सहशिक्षक गोविंद गिरी, अंजना बागुल यांचेसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
अंबानेर शाळेत चिमणीपाखरांसाठी दाणापाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 4:56 PM
उपक्रम : आवारात केली सुविधा
ठळक मुद्देरिकाम्या बाटल्या कापून त्यामध्ये पाणी ठेवले असून काही बाटल्यांमध्ये खाऊ ठेवला जात आहे.