नाशिक : भारताची प्रगती व सामाजिक जडणघडण व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात कुटुंब नियोजन, वीज वितरण यांसह महानदी जोडप्रकल्प या विषयांवर भरीव कार्य केले असून, ते नदीजोड प्रकल्पाचे आद्यप्रवर्तक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य हरी नरके यांनी केले. पाथर्डी फाटा येथील विक्रीकर विभागाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक युगप्रवर्तक’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अपर विक्रीकर आयुक्त चित्रा कुलकर्णी, तर प्रमुख अतिथी सहविक्रीकर आयुक्त एच. ए. बाखरे, विक्रीकर आयुक्त बी. बी. राठोड उपस्थित होते. यावेळी बोलताना नरके म्हणाले, भारतातील मोठ्या धरणांपैकी १५ धरणांची निर्मिती व पूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेले आहे. सद्यस्थितीत देशातील अनेक भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व पशुधनाची हानी होते. या धोक्याचा पूर्वानुमान करून आंबेडकर यांनी नदी जोडप्रकल्पाची अतिशय सखोल मांडणी केली असून, त्यामुळे विविध भागातील जमीन ओलिताखाली आणण्याची, तसेच प्राणी व नागरिकांच्या पाण्याचे नियोजन नदीजोड प्रकल्पामधून होऊ शकते, असे मत नरके यांनी व्यक्त केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एका धर्माचे, जातीचे नेते नसून ते एक जागतिक ताकदीचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच आजही सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम असल्याचे चित्रा कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, एच. ए. बाखरे यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
आंबेडकर नदीजोड प्रकल्पाचे आद्यप्रवर्तक
By admin | Published: February 01, 2016 11:25 PM