नाशिक : ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांमध्ये होती. असे आंबेडकरी शाहिरी जलसे म्हणजे समाजप्रबोधनाचे मोठे साधन किंवा माध्यम आहे.मध्यंत- राच्या काळात या आंबेडकरी शाहिरी जलशांची परंपरा खंडित होत असताना पुन्हा एकदा या कार्याला कार्यशाळा आणि शिबिराच्या माध्यमातून नवऊर्जा प्राप्त होत आहे. तत्कालीन तमाशा सादरीकरणातील अश्लाघ्य भाग कमी करून त्याऐवजी समाजप्रबोधन आणि बुद्धविचार यांना चालना देणारे लोककला प्रकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळच्या कलाकारांनी रूढ केले, त्यालाच ‘आंबेडकरी जलसा’ असे म्हटले जाते. यासंदर्भात माहिती देताना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आंबेडकरी जलशाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भीमराव कर्डक, श्रावण यशवंते, वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार असे अनेक थोर शाहीर डॉ. बाबासाहेबांचे विचार आंबेडकरी जलशांमधून मांडत होते. त्यावेळी खुद्द डॉ. बाबासाहेब म्हणाले की, माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिराचे एक गाणे बरोबरीचे आहे. साहजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात आणि त्यानंतरही आंबेडकरी जलशांना मोठी लोकप्रियता लाभली होती. आंबेडकरी जलशांना सामाजिक प्रबोधनाची परंपरा लाभलेली असल्याने त्यात भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, संत तुकाराम आदींचे विचार परखडपणे मांडले जात होते.अत्याधुनिक संवाद माध्यमामुळे अलीकडच्या काळात मात्र बाबासाहेबांवरील अनेक गाणी लोकप्रिय झाली आणि आंबेडकरी जलशाची चळवळ काही प्रमाणात मागे पडली होती. परंतु आता पुन्हा एकदा नवयुवकांना आंबेडकरी जलशाचे आकर्षण वाटू लागले आहे, असेही शेजवळ यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर शाहीर वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे ठिकठिकाणी आंबेडकरी जलशासंबंधी कार्यशाळा व शिबिर घेण्यात येत असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन कलावंतांना आकर्षणआंबेडकरी विचारांचा वणवा लोककलांद्वारे समजून घेण्यासाठी आंबेडकरी जलसा हे लोकप्रबोधनाचे अत्यंत लोकप्रिय साधन होते. या जलशांमध्ये पूर्वी ज्येष्ठ कलावंत नागसेन सावदेकर, ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप आदी कलावंत आपली कला सादर करीत असत. हीच परंपरा काही प्रमाणात शाहीर नंदेश उमप, डॉ. गणेश चंदनशिवे, अनिरुद्ध वणकर आदी कलावंतांनी जपली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे गेटवे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपात आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आंबेडकरी जलशाकडे नवीन कलावंत वळू लागले आहेत.
आंबेडकरी जलशांच्या खंडित परंपरेला पुन्हा नवऊर्जा प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:59 AM