लासलगाव/येवला : कांद्याचे बाजारभाव घसरल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी येवला तालुक्यातील आंबेगावात घडली.बाळू मोतीराम आव्हाड असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर शेतीसाठी घेतलेले सुमारे दोन लाख रुपये कर्ज असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. दुष्काळ हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना लागलेले ग्रहणच. तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने सर्वच जलस्रोत कोरडेठाक झाले आहेत. लागवड केलेल्या कांदा पिकास पाणी देण्यासाठी नातेवाइकांकडून हातउसणे करत बोरवेल केली. मात्र तिही कोरडी निघाल्याने त्यानंतर पुन्हा सासऱ्यांकडून उसनवारी करत दुसरी बोअरवेल केली. तिही कोरडीच निघाल्याने निराश झालेल्या आव्हाड यांनी कांदा विक्र ी केला असता, त्याला ५२१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याच्या घसरत्या भावामुळे विक्र ी केलेल्या कांद्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची कशी परतफेड करायची या नैराश्यातून बाळू आव्हाड यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)
तरुण शेतकऱ्याची आंबेगावी आत्महत्त्या
By admin | Published: February 24, 2016 10:50 PM