त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण ओव्हरफ्लो झाले तरी शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरूनही शहरातील श्री निरंजनी आखाडा परिसरात असलेल्या आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी काॅलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र, गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवाशांना गेल्या सात दिवसांपासून पाणीच नसल्याने अन्य जलाशयातून पाण्याची गरज भागवावी लागत आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय नि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना अपेक्षित असताना चालढकल केली जात आहे. अनेक भागात सात ते आठ दिवसांपासून पाणी नसल्याने संबंधित भागातील रहिवासी विहिरी, झरे अशा माध्यमातून पाणी आणत आहेत. त्यामुळे अनेकांना साथीचे आजार जडले आहेत. नगर परिषद अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून पाणी उचलत असते. अशावेळी पालिकेने यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.