नांदूरवैद्य : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच महामार्गावरील अपघातातील रुग्णांचा आधार म्हणून जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने कसारा घाट पोलीस चौकीला मोफत रुग्णवाहिका भेट देण्यात आली. यावेळी डीवायएसपी नाजीर शेख यांच्या हस्ते जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत एसपीआय अमोल वालझाडे, पूनम राखेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी - कसारा घाटादरम्यान अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून, या ठिकाणी तात्काळ रुगणवाहिकेची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु दिवाळीच्या मुहूर्तावर जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने येथील पोलीस चौकीसाठी एक रुग्णवाहिका देऊन संस्थानने मोलाची कामगिरी बजावली आहे.या मोफत रुग्णवाहिकेमुळे महामार्गावरील अपघातातील रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे नाजीर शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना शशिकांत धनू यांनी केली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सागर डगळे, जिल्हाध्यक्ष संदीप खंदारे, इगतपुरी तालुकाध्यक्ष संतोष थोरात, रुग्णवाहिका निरीक्षक राजेंद्र उदावंत, एएसआय सागर डांगळे, पोलीस कर्मचारी नितीन दराडे, महेंद्र बागुल, उमेश खालकर, इगतपुरी महिंद्रा पोलीस चौकी आदींसह जिल्हा सेवा समितीचे सदस्य व इगतपुरी तालुका सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.