नाशिक : भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्मारक म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी शिवारातील हेमाडपंती स्थापत्यशैलीची जैन व हिंदूंची नऊ मंदिरे ‘संरक्षित वास्तू’ म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केले आहेत. या मंदिरांची काळानुरूप पडझड होऊन ऐतिहासिक ठेवा ढासळला आहे. विशेष म्हणजे हा ठेवा जतन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने १६ कोटी ७५ लाखांचा निधीदेखील मंजूर केला आहे.सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षांहून अधिक प्राचीन हेमाडपंती जैन व हिंदू मंदिरांचा दुर्मीळ ठेवा नामशेष होत आहे. गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. टप्प्याटप्याने निविदाप्रक्रिया राबवून दुरुस्तीसंबंधित विविध विकासकामे केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सुरू असल्याचा दावा केला जात आहे; मात्र मंदिरांची पडझड मोठ्या प्रमाणात अद्याप सुरूच आहे.
संवर्धन आराखडा तयारकेंद्रीय पुरातत्व विभागाकडून अंजनेरी शिवारातील सुमारे १६ मंदिरांच्या देखभालदुरुस्तीचा संवर्धन आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिरांचा परिसर सुरक्षित करण्यावर पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाने भर दिला असून, संरक्षण कुंपणाची दुरुस्ती करण्यात येऊन प्रवेशद्वारही बसविण्यात आले आहे. मंदिरांची स्थापत्यकला ही अत्यंत प्राचीन असून, मंदिरांची ढासाळलेले दगड पुन्हा त्याच पद्धतीने बसवून दुरुस्तीचे कामाला मोठा कालावधी लागणार आहे. लवकरच मुख्य वास्तूच्या दुरुस्तीची निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. या मंदिरांच्या पुनर्विकासासाठी अंदाजपत्रकातील निधी अलीकडेच पुरातत्व विभागाला प्राप्त झाल्याची माहिती पुरातत्व विभाग औरंगाबाद कार्यालयाकडून मिळाली.