नाशिक : अमित ठाकरे यांची गाडी अडवून ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला अन् मनसे आणि भाजपा यांच्यात शाब्दित युद्ध रंगले. मनसे नेते सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. अशातच टोलनाका फोडणाऱ्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे यांनी सत्कार केला आहे. तसेच समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केले.
"जे काही झालं ते मुद्दामहून घडवून आणलं नाही, अनाकलनीय घडलं. प्रेमापोटी मी भेटायला आलो आणि त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. टोलबद्दल योग्य मेसेज द्यायला पाहिजे. बाऊन्सर टोलवर ठेऊन दादागिरी होत असून सामान्य लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार व्हायला हवा. टोलच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ठाणे, वाशी टोलनाक्यावर एक तास थांबावे लागते. रोडसाठी ८ ते १० टॅक्स वेगळे भरतो. मी येताना व्हिडीओ काढायला विसरलो. मी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला इथे आलो आहे", असेही अमित ठाकरेंनी म्हटले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हा तर फक्त ट्रेलर होता... तसेच हा तर फक्त ट्रेलर होता, वेळ आली तर पिक्चर पण दाखवू, असा उल्लेख असलेला केक कार्यकर्त्यांनी आणला होता तो कापण्यात आला. टोलनाका फोडणारे शहराध्यक्ष यांना जामीन मिळाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आजही ऊर्जा आहे आणि राहील. भाजपाच्या टिकेला मी भीक घालत नाही, एक ओला वाले येऊन भेटले अन् म्हणाले की, तुमच्यामुळे ४९० रूपये वाचले. हा विचित्र प्रकार आहे हे थांबले पाहिजे. एकदा राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना संधी द्या, असे अमित ठाकरेंनी आणखी सांगितले.