साकोरा : नांदगाव तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतीला सन २०१७-२०१८ ह्या वर्षाचा तालुक्यातील प्रथम स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला असून जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्र मात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमोदे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ.वैशाली पगार व ग्रामसेवक मिलिंद सोनावणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेच्या निकषात व स्वरूपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस या योजनेत सहभागी होण्याची समान सधी उपलब्ध होईल अशा पद्धतीने स्मार्ट ग्राम योजनेचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तपासणी समिती तथा स्थानिक देखरेख समितीने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची तपासणी केली होती. सन २०१७-२०१८ मध्ये तालुका तपासणी समितीने जिल्ह्यातून एकूण १६८ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येक तालुकानिहाय दिलेल्या गुणांकावर तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त नियमानुसार नांदगाव तालुक्यातून आमोदे ग्रामपंचायतीची प्रथम स्मार्ट ग्राम म्हणून निवड केली होती. या मध्ये आमोदे ग्रामपंचायतीस ६४५ गुण मिळाले होते.
आमोदे ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 5:56 PM
प्रथम क्रमांक : पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण
ठळक मुद्देआमोदे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ.वैशाली पगार व ग्रामसेवक मिलिंद सोनावणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला