नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील महिला पदाधिकाऱ्यांना पदे वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खदखद शनिवारी (दि.१०) दुपारी पक्षाचे राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढ्यातच बाहेर पडली.
पक्षातील माजी महिला जिल्हा प्रमुख लक्ष्मी ताठे व ज्येष्ठ नेत्या शोभा मगर यांच्यात शासकीय विश्रामगृहावर शिवीगाळ व धराधरी होऊन एकमेकांच्या झिंज्या उपटण्यात आल्या. दोन्ही बाजुंचे समर्थक एकमेकांवर शिवीगाळ करून चाल करून जात असतांना काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मिटवामिटवी केली. मात्र त्यानंतर तक्रार करण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गेले असता, तेथेही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने राजकीय तणाव निर्माण झाला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील लक्ष्मी ताठे व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ताठे यांच्याकडे महिला जिल्हा प्रमुखपद सोपविण्यात आले व काही पदाधिकाऱ्यांच्याही नेमणूका करण्यात आल्या. मात्र तीन महिन्यांपूर्वी ठाकरे गटातील शोभा मगर, श्यामला दीक्षित, ज्योती देवरे, मंगला भास्कर या जेष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षातील महिला गटांमध्ये वाद सुरू झाले.
महिला आघाडीची पुर्नरचना करण्याच्या निमित्ताने पक्षाचे सचिव संजय म्हस्के यांनी तीन महिन्यांपुर्वी नाशिकची महिला आघाडी बरखास्त केली. तेव्हापासून शिंदे गटात महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पदांवरून खदखद सुरू होती.