सटाणा : बागलाण तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज तस्करी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, वाहने जप्त करून दंड थकविणाऱ्या वाहनांचा लिलावही सुरू केला आहे.
दंडाची ५ लाख ८० हजारांची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अजय झाल्टे (रा.नाशिक) यांच्या वाहनाचा येत्या दि. १२ जुलै रोजी लिलाव करून दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान, तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
बागलाण तालुक्यातील गिरणा, आरम, मोसम, हत्ती, कान्हेरी आदी नद्यांमधून वाळू तस्करांकडून दररोज बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असतो. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडतो. या पार्श्वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी वाळू तस्करांविरोधात धडक मोहीम हाती घेतल्याने गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. इंगळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने गेल्या वर्षभरात धडक कारवाई करत अवैध वाळू उपसा करणारी अनेक वाहने जप्त केली. त्यांच्याकडून दंडाच्या रकमेची वसुली करण्याचे काम सुरू असताना अजय झाल्टे (रा.नाशिक) या वाहनमालकाने दंडाची दंडाची ५ लाख ८० हजारांची थकीत रक्कम अद्यापही भरलेली नाही. तहसील कार्यालयाच्या आवारात वाहन धूळ खात पडून आहे. त्यामुळे येत्या दि. १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या दहा ट्रॅक्टरचा लिलाव करणार असल्याचे तहसीलदार इंगळे-पाटील यांनी जाहीर केले आहे. लिलावासाठी निविदा अर्जाचे शुल्क पाचशे रुपये आणि लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपये रोखीने जमा करणे आवश्यक आहे. याबाबत इच्छुकांनी नायब तहसीलदारांशी संपर्क साधावा. लिलावावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे आवाहनही इंगळे-पाटील यांनी केले आहे.