नाशिक - पावसाळ्यात अनेक जंतूंचा प्रार्दुभाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते आणि ही लागण पसरून अनेकांना त्रास सुरू होतो. सर्दी, ताप, खोकल्याने अनेक रुग्ण हैराण असताना आता नााशिकमध्ये लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील संख्या रोडावली आहे. शाळांमधूही अशा मुलांना सुटी दिली जात आहे.
पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक साथीचे आजार उद्भवतात. थंडी, ताप, खोकला, तसेच सर्दी, डोकेदुखी या आजाराने नाशिककर त्रस्त झाले असून रुग्णालयात अशा रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. फॅमिली डॉक्टर्सकडे अशा रुग्णांची मोठी रांगच लागली असल्याचे एकूणच चित्र आहे. कुटुंबात एकापेक्षा अधिक जणांना संसर्गजन्य आजाराची लागण होऊन रुग्णसंख्या वाढत असताना आता शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले आहे.
पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरू झाल्याचे आढळून येत आहे. जिल्हा रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम जाणवू लागला आहे. शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे, तर पालकांनादेखील याबाबत सांगितले जात आहे.
शहरातील अनेक शाळांनी डोळ्यांचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम शाळांमधील उपस्थितीवर होत आहे, तर शालेय वाहतुकीच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या रोडावली असल्याचे दिसून येते. ज्या मुलांचे डोळे चुरचुरत आहेत किंवा ज्यांचे डोळे लाल झाले आहेत अशा मुलांना तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत सांगितले जात आहे. गावठाण, झोपडपट्टी, तसेच गलिच्छ ठिकाणी भरणाऱ्या महापालिका, तसेच खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.