ओझर : खेरवाडी (नारायणगाव) येथील ज्येष्ठ नागरिक मोतीराम दादा संगमनेरे शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना अंधारात रुळांमध्ये पाय अडकून पडले. याचवेळी भुसावळकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या किसान रेल्वेने त्यांना उडविल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
उड्डाणपुलाचे काम सुरू होणार म्हणून गेली दहा महिन्यांपासून खेरवाडी येथील रेल्वे गेट बंद केले आहे. मात्र अद्यापही उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले नाही. उड्डाणपुलाचे काम सुरू करा किंवा रेल्वे फाटक तरी उघडा याबाबत रेल्वे व उड्डाणपूल प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक लेखी पत्रे दिली. तसेच रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची याबाबत शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र मंत्र्यांचाही आदेशाला या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. या दहा महिन्यांत बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक रेल्वे रूळ ओलांडताना अपघातातून बचावले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी या रेल्वे अपघाताबाबत डॉ. भारती पवार यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली असता पवार यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे तसेच मोतीराम संगमनेरे यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
इन्फो
आश्वासनानंतर केले अंत्यसंस्कार
जोपर्यंत रेल्वे उड्डाणपूल प्रशासन तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे किंवा रेल्वे फाटक उघडण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संगमनेरे यांचे शव ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत व संतप्त खेरवाडी ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान, आरपीएफचे व भुसावळ जंक्शनचे अधिकारी यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेतले व ज्या ठिकाणी दिवे नाही तेथे दिवे लावण्याचे तसेच उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेऊन संगमनेरे यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.