त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.हा मृतदेह ज्याठिकाणी आढळला तो परिसर निर्जन व दाट जंगलाचा भाग आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९.३०च्या सुमारास हा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सी. एस. जाधव, पोलीस नाईक एस. डी. पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
हा मृतदेह पुरुषाचा असून, वय अंदाजे ३० ते ४०च्या दरम्यान आहे. चेहरा उभट, रंग गोरा, सडपातळ पांढऱ्या रंगाचा व त्यावर भगव्या रंगाची नक्षी असलेला फूल बाह्यांचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू रंगाची मळकट पँट, पांढऱ्या रंगाची बनियन त्यावर ह्यसंजयह्ण असा मार्क असलेली चॉकलेटी रंगाची अंडरपँट, उजव्या हाताच्या कांबीवर पीए असे गोंदलेले व उजव्या पंजाच्या वरच्या भागावर ओम असे गोंदलेले आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर हत्याराने अनेकवेळा मारुन चेहरा विद्रुप करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून, याबाबतची फिर्याद त्र्यंबक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक चंद्रभान सखाराम जाधव यांनी दिली आहे. अंबोली-तोरंगण घाटात यापूर्वीही अनेकवेळा खून करून मृतदेह फेकून देण्याच्या घटना घडल्या आहेत.