नाशिक : महापालिकेच्या घंटागाड्यांवरील ८०० कामगारांना यंदा दिवाळी बोनस नाकारण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील यासंदर्भात कायदा दाखवल्याने नाराज झालेल्या घंटागाडी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी घंटागाडी कामगारांना महापालिका सानुग्रह अनुदान घोषित करत असते. हे सानुग्रह अनुदान संबंधित ठेकेदार शासन नियमांप्रमाणेच देत असतात. परंतु यंदा मात्र आयुक्ततुकाराम मुंढे यांनी कंत्राटी कामगार वगळल्याने घंटागाडी कामगारांनादेखील वंचित राहावे लागणार आहे. सोमवारी (दि.२९) यासंदर्भात नाशिक महापालिका श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब ते राजीव गांधी भवन असा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर महादेव खुडे आणि कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या प्रतिनिधी मंडळाने आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. दलित आणि अस्पृश्यांना महापालिका बोनस देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे खुडे आणि देसले यांनी सांगताच आयुक्तांनी अस्पृश्य शब्द मागे घेण्यास सांगितले. त्यावरून शाब्दिक वाद झडल्याचे समजते. भरपगारी रजा आणि अन्य मागण्यांबाबत आयुक्तांनी ठेकेदाराकडील कागदपत्रे मान्य धरत संघटनेकडे याच ठेकेदारांकडील असलेली कागदपत्रे ग्राह्य धरण्यास नकार दिला त्यामुळे प्रश्न सुटू शकला नाही. यासंदर्भात श्रमिक संघाने महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. महापालिकेने प्रतिवर्षाप्रमाणे ठेकेदारास ८.३३ टक्के बोनस देण्याचे आदेश न दिल्यास ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महादेव खुडे यांनी दिला आहे.
ऐन दिवाळीत घंटागाडी कामगारांचे ‘कामबंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:06 AM