नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळी १० वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रामकुंडावर गोदावरी मातेचे अभिषेक व पूजन करून पवित्र स्नान केले. तसेच गंगा गोदावरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान, त्यापूर्वी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांनीदेखील सकाळी ९.१५ वाजता रामकुंडावर गोदापूजन करून पवित्र स्नान केले. यावेळी गोदाघाटावर मोठा पोलीस बंदोबस्त होता.त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या शाही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाशिक येथे गोदावरीत पवित्र स्नान करण्यासाठी साधू-महंत व भाविकांसह राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचा वाहन ताफा रामकुंड पोलीस चौकी परिसरात आला. त्यानंतर अहिर यांनी लगेचच रामकुंडावर जाऊन गोदामातेचे पूजन करून पवित्र स्नान केले. गंगागोदावरी मंदिरात पुरोहित संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एक तासाने गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या आपल्या कुटुंबीयांसमवेत रामकुंडावर आल्या. गोदामातेला अभिषेक व पूजन करून त्यांनी पवित्र स्नान केले. त्यांच्या समवेत गुजरातचे उच्चशिक्षणमंत्री वसू त्रिवेदी व आमदार देवयानी फरांदे होत्या. गंगा गोदावरी मंदिरात जाऊन पटेल कुटुंबीयांनी दर्शन घेतले. पुरोहित संघातर्फे सतीश शुक्ल यांनी सर्वांचा सत्कार केला व सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, अतुल गायधनी, नितीन पाराशरे, चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आनंदीबेन पटेल, अहिर यांचे गोदापूजन
By admin | Published: September 26, 2015 12:01 AM