पंडित महाराज कोल्हेवारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनतदेखील करत असतो. परंतु वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की केवळ माझ्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मी या मोहमयी संसारातून निघालो आहे आणि जे काही अन्न-पाणी मिळेल त्यावर गुजराण करीत, मिळेल तो निवारा घेत किंवा उघड्यावर रात्र काढीत मला फक्त पुढे पुढे जायचे आहे हा एकच ध्यास घेऊन वारकरी चालत राहतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी ती मनाची अवस्था असते. दुसरे म्हणजे वारी हा समन्वय असतो. काही लोक अन्नदान करतात, श्रीमंत लोक अन्नदान करतात; परंतु ते वारीत सहभागी होत नाहीत. काही लोक वारीत सहभागी असतात, परंतु ते परिस्थितीने गरीब असल्याने अन्नदान करू शकत नाही. याउलट काही लोक वारीतही सहभागी होतात आणि अन्नदानही करतात. म्हणजे या तिन्ही प्रकारच्या लोकांचा समन्वय येथे असतो. सर्वांनाच पुण्यप्राप्ती होते. एकप्रकारे अंतरिक समाधान मिळते. या ठिकाणी वारीमध्ये आपल्याला विचारांचा आणि आचारांचा समन्वय दिसून येतो. ‘अवघे धरू सुपंथ’ असा विचार येथे प्रत्येकांच्या मनात असतो. वारकरी सांप्रदाय हा मनुष्याला कर्म करायला प्रवृत्त करत असतो. संसारात राहूनच आपण परमार्थ साधू शकतो असे साधे सोपे तत्त्वज्ञान या वारकरी सांप्रदायाचे आहे. संतांनीदेखील हाच संदेश आपल्याला दिलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर दुसरा लगेच धावून जातो, आपल्या भाकरीतील अर्धी भाकर दुसऱ्याला देतो, पाण्याचा तांब्या दुसºयाला भरून देतो. या ठिकाणी प्रत्येक वारकरी रोज १५ ते २२ किलोमीटर पायी चालतो, परंतु मुखी हरिनामाचा गजर असल्याने त्याला चालण्याचे श्रम वाटत नाही. मन आणि शरीर भक्तिमय होऊन जाते. एक प्रकारे आनंदाचा महासागर म्हणजे वारी होय. या ठिकाणी आपली संसारिक दु:खे बाजूला ठेवून प्रत्येकजण विठुमाउलीचे भजन म्हणत राहतो, कीर्तन ऐकत असतो. एकप्रकारे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा हा अनुपम्य सुख सोहळा असतो. हा अनुभव मी स्वत: घेत आहे.(लेखक संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचे प्रमुख)
आनंदाचे डोही आनंद तरंग...अनुपम्य सुख सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:03 AM