नाशिक : अधिक मास तथा पुरुषोत्तम मास सुरू झाल्यामुळे विविध धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने सजू लागली असून, देवाला तसेच जावयांना द्याव्या लागणाऱ्या अनारसे, बत्तासे, लाह्या यांची दुकाने फुलू लागली आहेत.अधिक मास म्हणजे अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांचा काळ. चतुर्मासाला लागून आलेल्या या महिन्यात शंकर आणि विष्णू यांचे पूजन केले जाते. त्यासाठी विविध प्रकारच्या पोथ्या आणि साहित्य लागते. यामुळे बाजारपेठ सज्ज होत असून, भांडे आणि सराफ बाजारातील उलाढाल त्यामुळे वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच जुलैपासून सुरू होणारे कोकिळाव्रत आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक मास आणि कोकिळा व्रताच्या महिन्याभराच्या काळात पुण्याहवाचन, संकल्प, ठरावीक दिवसांचे व्रत करण्यात येते. याशिवाय ऐपतीनुसार कोकिळा दान केल्या जातात. त्यामुळे त्या वस्तूंची बाजारात मागणी आहे. अनारसे आणि बत्तासे यांना असलेल्या मागणीमुळे तेही बाजारात उपलब्ध झाले आहेत. तयार अनारसे १५० ते २०० रुपये किलो, तर बत्तासे ६० रुपये किलो या दराने मिळत आहेत. बत्तासेंमध्ये विविध प्रकार असल्याने त्यांचे दरही वेगवेगळे आहेत. जावयाला चांदीची वस्तू भेट देण्याची प्रथा असल्याने सराफ बाजारातही चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी १६ जुलै आणि १३ आॅगस्ट असे दोनच गुरु पुष्य योग आहेत. यावर्षी अवघी एकच संकष्ट अंगारकी चतुर्थी आहे. (प्रतिनिधी)
अनारसे, बत्तासे यांनी फुलली दुकाने
By admin | Published: June 18, 2015 12:09 AM