नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात रामकुंडाजवळ असलेल्या जगभरातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. गोदाप्रेमी देवांग जानी यांनी कपालेश्वर मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करून मंदिराच्या छतावरील कळसाजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिलालेख आढळून आला. या शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत. कपालेश्वर महादेव मंदिराला धार्मिक-पौराणिक माहात्म्य लाभलेले आहे. रामशेज किल्ल्यावरून उगम पावणारी अरुणा ही उपनदी गोदावरीला येऊन मिळते. म्हणून या ठिकाणी कपालेश्वर मंदिराची उभारणी झाली. भगवान शंकर यांनी गोदा-अरुणा संगमावर स्नान केल्यानंतर विश्रांतीसाठी जवळच्या उंच टेकडीची निवड केल्याचे सांगितले जाते. अशा या ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराच्या शिलालेखाबाबत गॅझेटियरमध्येही कुठलीही नोंद किंवा माहिती जानी यांना आढळली नाही. त्यानंतर त्यांनी ‘कि टू नाशिक-त्र्यंबक’ पुस्तक अभ्यासण्यास सुरुवात केली. या पुस्तकात त्यांना शिलालेख असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यानुसार मंदिराच्या छताजवळ शोध घेण्यास प्रारंभ केला. वॉटरप्रूफिंगमध्ये प्राचीन शिलालेख झाकला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ते सुरक्षितपणे उकरून शिलालेख मोकळा केला.असा आहे मंदिराचा इतिहास‘की टू नाशिक-त्र्यंबक’ या पुस्तकानुसार इ.स. ११०० साली स्थानिकांच्या विनंतीवरून गवळी राजाने जमिनी विकत घेत पाच हजार रुपये खर्च करून श्री कपालेश्वर मंदिर उभारले व संस्थानाकडे सोपविले. १७३८ मध्ये कोळी राजा नाशिकला मुक्कामी आला असता उर्वरित मंदिराचे बांधकाम त्याने पूर्ण केले. त्याचवेळी त्या राजाने शैव-गुरवांची नियुक्ती मंदिरात पूजाविधीसाठी केली. इ.स. १७६३ साली मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार यांनी बांधून दिल्या. मूळ सभामंडपाचे बांधकाम जगजीवनराव पवार यांनी केले. १९०२ साली शेठ खिमजी आसर व अन्य काही लोकांनी वीस हजाराचा खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द केले.
‘कपालेश्वर’च्या कळसाजवळ आढळला प्राचीन शिलालेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:36 AM