नाशिक : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात साडेचार कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन त्यासाठी अडीच कोटींच्या रकमेस वित्तीय मान्यता देण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.मागील वर्षी ३ जुलै २०१५ रोजी खासदार हेमंत गाडसे यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे संचालक राजन कृष्णाजी यांच्या सोबत सुंदर नारायण मंदिरास भेट दिली होती. त्यावेळी मंदिराच्या शिखराची आजची परिस्थिती अतिशय धोकादायक असल्याचे निदर्शनास आले.नाशिक शहराच्या मध्यवस्तीत रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी हे मंदिर इ.स. पूर्व १६७८ म्हणजेच सन १७५६ मध्ये पेशव्यांचे सरदार गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी बांधले होते. या मंदिराच्या शिखराची उंची ५० ते ५५ फूट असून, त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. हा सर्व भाग धोकेदायक झाला असून तो मूळ स्वरूपात बांधणे गरजेचे होते. त्यामुळे अशा ऐतिहासिक सुंदर नारायण मंदिराची दुरुस्ती व नूतनीकरण व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी जुलै २०१५ मध्ये सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसे तावडे यांना या कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली. त्यानुसार सुमारे १२ कोटी ५० लाखांच्या रकमेचा सुंदर नारायण मंदिर नूतनीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव मान्य करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ४ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. तसेच १३ जुलै २०१६ रोजी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद धरण्यात आल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आता या प्राचीन व ऐतिहासिक वास्तुला पुनर्वैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
प्राचीन सुंदर नारायण मंदिराचे पालटणार रूपडे
By admin | Published: July 17, 2016 12:38 AM