नाशिक : पितृपक्षात श्राद्धकर्म करून पितरांना नैवेद्य दाखवायचा तर कावळेच येईनात...मग कावळ्याचा शोध सुरू असतानाच एका झाडावर जखमी अवस्थेत कावळा दिसला आणि सर्वच जण त्या दिशेने धावले. काहींनी भूतदया दाखवून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या कावळ्याची सुटका केली पण नंतर मात्र या कावळ्याने नैवेद्याला स्पर्श करावा म्हणून सर्वांचीच धावपळ झाली. येथील एका गृहस्थाने तर कावळाच हाती घेतला आणि ज्याला पाहिजे त्याला काकस्पर्श करून देण्याचा अनोखा प्रकार सुरू केला. शुक्रवारी एक वाजेच्या सुमारास नाशिकच्या तपोवन परिसरात हा प्रकार घडला.सध्या पितृपक्ष सुरू असून, श्राद्धकर्म सुरू आहे. दक्षिण गंगा गोदावरीच्या तटी श्राद्ध कर्माचे महत्त्व अधिकच. परंतु येथेही कावळ्यांची संख्या एक तर कमी आणि त्यातच श्राद्धकर्मानंतर ठेवण्यात येणारे पिंड किंवा नैवेद्याला शिवण्यासाठी कावळेच लवकर येत नाहीत ही एक समस्या. अशा स्थितीत पितृपक्षात पूर्वजांनी काकस्पर्श केला तर नैवेद्य ठेवणारेही समाधानी होतात. तथापि, तपोवनात जेथे खूप झाले आहेत, अशा ठिकाणीही कावळे अधिक असताना ते काकस्पर्श करेनात त्यामुळे परिसरातील नागरिक हवालदिल झाले होते.सकाळी अकरा वाजेपासून असे अनेकजण प्रतीक्षेत असतानाच एका झाडावर नायलॉनच्या धाग्यात एक कावळा अडकलेला दिसला. मग या कावळ्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात कोणाला यश न आल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. या दलाच्या जवानांनी तेथे येऊन कावळ्याची सुटका केली. त्यानंतर मात्र सर्वच जण नैवैद्य घेऊन त्या कावळ्यासाठी पुढे उभे राहिले. एका गृहस्थाने तर कावळाच आपल्या हाती घेतला आणि नैवद्याला काकस्पर्श करून सर्वांना पूर्वजांचा आशीर्वाद देऊन टाकला.
...आणि लाभला काकस्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:24 AM