पंचवटी : आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २४) मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमाराला आडगाव पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळाहून पूजेचे साहित्य तसेच मांत्रिकासह पाच संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पैशांचा पाऊस पाडण्याचा डाव हाणून पाडल्याने पैशांचा पाऊस पडलाच नाही. भरवस्तीत घडलेल्या अघोरी विद्येच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील गीता गंगाधर आंबेकर या महिलेने आडगाव पोलिसांत तक्रार दिल्याने संशयितांवर जादूटोणाविरोधी कायद्या कलम २ आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच संशयितांना अटक केली आहे. आंबेकर या महिलेला पैशांची गरज असल्याने नाशिकरोड येथे राहणाऱ्या ओळखीचे प्रमोद सूर्यवंशी यांनी आंबेकर यांना सांगितले होते की, काही मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात, परंतु त्यासाठी एक कुमारिका मुलगी देवी म्हणून बसवावी लागते तसेच मांत्रिक व पूजापाठ करण्यासाठी ६० हजार रुपये द्यावे लागतील ते केल्यावर मांत्रिक एक कोटी रुपयांचा पाऊस पाडेल, असे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून होकार दिला.बुधवारी (दि. २३) आंबेकर या पुतणीसह नाशिकरोडला आल्या तेथे संशयित सूर्यवंशी याच्याशी भेट झाल्यानंतर ३० हजार रुपये दिले व बाकी काम झाल्यानंतर पैसे देण्याचे ठरले त्यानंतर सिडकोतील मांत्रिक संदीप सीताराम वाकडे (३५), देवळाली गावातील सुधीर दत्तू भोसले (३४), सिडकोतील तुषार नरेंद्र चौधरी (४०), चंद्रकांत जेजूरकर, निखिल (मांत्रिक) पूर्ण नाव माहीत नाही यांची ओळख करून दिली. त्यानंतर संशयितांनी लिंबू, हळद, कुंकू, आंब्याची पाने, नारळ, अत्तर, विड्या, कानातील रिंग, पेढे, आदी वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून पूजा मांडली व पुतणीला खोलीत पांढरी साडी परिधान करून दागिने परिधान करून डोळे मिटून बसण्यास सांगितले.पूजेचे साहित्य जप्तअघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच आडगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाफुले, देवराम वनवे, नाजिम शेख, वैभव परदेशी, विनोद लखन, विजयकुमार सूर्यवंशी, मनोज खैरे, वैभव खांडेकर, दीपक भुसारे, राजू गांगुर्डे आदींनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी संशयितांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्या करून पूजा आढळून येताच पोलिसांनी मांत्रिकासह संशयितांना ताब्यात घेतले, तर एक मांत्रिक पसार झाला असून घटनास्थळाहून पोलिसांनी पूजेचे साहित्य जप्त केले आहे.
...अन् पैशांचा पाऊस पडलाच नाही; अघोरी विद्येचा प्रकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:38 AM