नांदगाव : विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत बाहेर गावाहून येणाºया नोकरदारांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा फटका सामान्यांना बसत असतो हे उघड सत्य असले तरी, मंगळवारी (दि. १७) अप-डाउन करणाºया एका अधिकाºयाची चांगलीच फजिती झाली.निमित्त होते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे. सकाळी ११ वाजता निवडणूकप्रक्रि या सुरू झाली. तर निवडणूक निर्णय अधिकारी मात्र हुश्श हुश्श करीत कपाळावरचा घाम पुसत १ वाजून ५० मिनिटांनी निवडणुकीच्या स्थळी दाखल झाले. ग्रामपंचायत बिनविरोध होणार असल्याने त्यांच्या लेटमार्कची दखल घ्यायला विरोधी पार्टीच नव्हती. त्यामुळे ‘तेरी चूप, मेरी चूप’ होऊन निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी यांना घेऊन नाशिकहून निघालेली अति जलद रेल्वे गाडी मनमाडला थांबली नाही. अन्यथा तिथून अर्ध्या-पाऊण तासात नांदगावला येण्याची सोय आहे. मात्र, जंक्शनवर जी गाडी थांबली नाही ती नांदगावला थांबण्याचा प्रश्नच नव्हता. नांदगाव स्थानकातून भरधाव वेगाने ही गाडी चाळीसगावच्या पुढे गेली. जिथे ती थांबली तिथे उतरून हे अधिकारी स्पेशल चारचाकी गाडीने नांदगावला आले. तेथून पुढे संबंधित ग्रामपंचायत कार्यालय गाठले. तहसीलदारांना याप्रकरणी विचारणा केली असता ते याबाबत अनभिज्ञ दिसून आले. चौकशी करतो, एवढेच तहसीलदारांनी सांगितले. एरव्ही दररोजच्या कार्यालयीन वेळेत असे घडले असते तर त्याची फारशी दखल घेतली गेली नसती. किंबहुना ती घेतली जात नाहीच. कार्यालयातील कर्मचारी एखादी लोणकढी थाप मारून निभावून नेतात, असा अनुभव आहे.रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार नांदगाव तालुक्यतील अनेक कार्यालयांचे वेळापत्रकसुरू असल्याची बाब यानिमित्ताने लपून राहिलेली नाही.
...अन् अधिकाऱ्यास अप-डाउन महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:37 PM