’नाशिक : जुन्या नाशकातील मतदान केंद्रांवर सकाळपासून तर दुपारपर्यंत शुकशुकाट दिसून आला. दुपारी ३ वाजेपर्यंत परिसरातील सर्वच कें द्रांवर तुरळक मतदान झाले. साधारणत: पाच ते आठ टक्क्यांपर्यंत केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी होती; मात्र दुपारी ४ ते ६ या दोन तासांमध्ये सर्वच केंद्रे मतदारांच्या गर्दीने ‘हाऊ सफु ल्ल’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.हिंदू-मुस्लीम, दलितबहुल वस्ती म्हणून ओळख असलेल्या जुने नाशिक परिसरात सकाळपासून मतदारांमध्ये मतदानाच्या उत्साहाचा अभाव दिसून आला. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ पंधरा ते वीस मतदारांनी केंद्रांवर हजेरी लावली होती. दुपारनंतर वाढत्या उन्हाबरोबर मतदारांचेही प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून आले. मतदारदेखील लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्यामुळे सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. २ वाजेनंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जुन्या नाशकातील नागझिरी मनपा शाळा, सुमंत नाईक उर्दू शाळा, रंगारवाडा उर्दू शाळा, विद्यानिकेत मनपा शाळा, झारेकरी कोट मनपा शाळा, नॅशनल उर्दू हायस्कूल, बी. डी. भालेकर अशा सर्वच कें द्रांवर मतदारांचा ओघ सुरूच होता. दरम्यान, नागझिरी, सुमंत नाईक, नॅशनल, भालेकर या शाळांमध्ये लांबच लांब रांगा असल्याने सहा वाजेनंतरदेखील मतदानाची प्रक्रिया सुरूच होती. सुमारे साडेसात वाजेपर्यंत या केंद्रांवर मतदान होत होते. पोलिसांनी ६ वाजताच सर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारांचा ताबा घेत कुलूप लावले होते. पोलिसांची यात खूपच धावपळ झाली. (प्रतिनिधी)