नाशिक : एकीकडे भरून आलेल्या नभातून खरोखरीच पाऊस निनादत होता अन् त्याचवेळी ‘आला आला वारा, संगे पावसाच्या धारा’, नभ उतरू आलं, चिंब पावसानं रान झालं आबादानी’ अशी एकाहून एक सरस पाऊस गीतांमध्ये रसिक चिंब झाले होते. यावेळी बाबाज थिएटरतर्फे नाशिकचे तीन कलाकार तालवादक राजन अग्रवाल, सुहास खरे आणि रोहित पगारे यांना सन्मानचिन्ह देऊन पं. शंकरराव वैरागकर आणि प्रशांत जुन्नरे यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या संकल्पनेतून बारीश के तराने नये पुराने या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील पारंपरिक बंदीश पं. शंकरराव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘घनन घनन घन गरजत आये’ या रचनेने झाला. त्यात हिंदुस्थानी शास्त्रीय तालाला तीनतालाबरोबरच पाश्चिमात्य तालाची जोड देऊन त्यात फ्यूजन करून ही बंदीश सादर करण्यात आली. त्यानंतर गरज, गरज मेघ घनन छायो रे, घीर-घीर आयी बदरीया कारी, बरसे बदरीया सावनकी या बंदीशी आणि ठुमरी सादर करण्यात आल्या. त्यानंतर ही गुलाबी हवा, ये रे घना, ये रे घना, नभ उतरू आलं, वादळ वारं सुटलं गं, नभ मेघांनी आक्रमिले, अधीर मन झाले, चिंब पावसानं रान झालं, वारा गाई गाणे ही मराठी गीते सादर करण्यात आली. तर हिंदीच्या बारीश गीतांमधून म्हारा रे गिरीधर गोपाल, बादल घुमड घुमड बढ आये, नैनोमे बदरा छाये, सावन का महिना, रिमझिम गिरे सावन अशी एकाहून एक बहारदार गीते सादर करण्यात आली. विजयालक्ष्मी मणेरीकर, मृदुला, सागर, कृष्णा, दामिनी, अथर्व यांनी गाण्यांचे बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निवेदन श्रीपाद कोतवाल यांनी केले.