नाशिक : कुपोषीत बालके व गरोदर मातांसाठी राज्य सरकारकडून चालविण्यात येणा-या पोषण आहार आहार योजनेचे ७३ लाख रूपये जिल्हा बॅँकेकडे वर्ग करण्यात आल्यावर वर्ष उलटूनही बॅँकेकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी अखेर थेट जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाला धडक दिली. उधार, उसनवार करून अंगणवाडी कार्यकर्त्यांनी गोरगरिबांना पोषण आहार पुरविला परंतु हक्काचे पैसे मंजुर असूनही मिळत नसल्याने केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा थेट फटका त्यांना सहन करावा लागत आहे.जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीलाच त्याचे कंत्राट देण्यात आले असून, ८ महिने ते ८ वर्षे वयाच्या बालकांना अंडी, केळी, दूध तर गरोदर महिलांना पोषण आहार तयार करून तो त्यांना घरोघरी वाटप करण्यासाठी प्रति मानसी २५ रूपये या प्रमाणे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या वर्षासाठी बागलाण तालुक्यासाठी पोषण आहार योजनेंतर्गंत ७३ लाख, ५१ हजार ३२५ रूपयांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे जमा केले व सदरचे अनुदान ते पंचायत समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्तीला अदा करण्याचे ठरविले. जानेवारी २०१७ मध्ये धनादेशाद्वारे जिल्हा बॅँकेत अनुदान जमा झाले असले तरी, बॅँकेने नोटाबंदीचे कारण देत इतकी मोठी रक्कम एकाच वेळी अदा करता येणार नाही असे सांगत आरटीजीएस करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार टप्पाटप्प्याने काही रकमांसाठी आरटीजीएस करण्यात आले. परंतु खात्यावर पैसे नसल्याचे कारण देत धनादेश परत करण्यात आले. पैसे मिळत नसल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जिल्हा बॅँकेत धाव घेवून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली व त्यांनी आठ दिवसात पैसे देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देत अंगणवाडी सेविकांची बोळवणूक केली. दरम्यान जिल्हा बॅँकेकडे पाठपुरावा सुरू असतानाच बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले व त्यानंतर हा प्रश्न तसाच लोंबकळत पडला.सोमवारी या संदर्भात बागलाण तालुक्यातील सुमारे ३० ते ४० अंगणवाडी सेविकांनी थेट जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाला धडक दिली. यावेळी त्यांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले. यावेळी अहेर यांनी अंगणवाडी सेविकांना उर्मटपणे उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले.
७३ लाखासाठी अंगणवाडी सेविका नाशिक जिल्हा बॅँकेच्या दाराशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:26 PM
जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीलाच त्याचे कंत्राट देण्यात आले असून, ८ महिने ते ८ वर्षे वयाच्या बालकांना अंडी, केळी, दूध तर गरोदर महिलांना पोषण आहार तयार करून तो त्यांना घरोघरी वाटप करण्यासाठी प्रति मानसी २५ रूपये
ठळक मुद्देवर्ष उलटले : कुपोषित बालके, गरोदर मातांची हेळसांडकेंद्र सरकारच्या नोटाबंदीचा थेट फटका