नाशिक- तुटपुंजे मानधन आणि जीव धोक्यात घालून काम करतानाही कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी महापालिकेच्या अंगणवाडीतील सुमारे साडे सातशे सेविका मंगळवारी (दि.२९) राजीव गांधीभवनासमोर आंदोलन करणार आहेत. भारतीय हित रक्षक सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. नाशिक मध्ये कोरोना संसर्ग वाढत असताना आता राज्य शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरात घरसर्वेक्षण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे. त्यातील अनेक महिला या पन्नाशी उलटून गेलेल्या असून काहींना तर रक्तदाब, हृदयरोग, मधूमेह यांचा त्रास आहे. मात्र, त्यांना मोहिमेतून वगळण्यातआलेले नाही या सेविकांना पुरेसे संरक्षक कीट नाही की वैद्यकिय प्रशिक्षण देण्यात आले नाही त्यातच अवघ्या चार हजार रूपयांत त्यांना राबवून घेतले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे किरण मोहिते यांनीसांगितले.