नाशिक- कोरोना संसर्ग राेखण्यासाठी महापालिकेच्या अंगणवाडी सेविकाही झटत असून घरोघर सर्वेक्षण करून बाधितांची माहिती घेत आहेत. तसेच जनजागृतीही करीत आहेत.
गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या संकट काळात महापालिकेच्या अंगणवाडी सेविकांनी घर सर्वेक्षण करून बाधित आणि त्यांच्या संपर्कातील नागरिक तसेच जनजागृतीचे काम केले होते. त्याचा फायदाही झाला होता. आताही कोरोनाचा संकट काळ परतल्यानंतर या अंगणवाडी सेविका जोखीम पत्करून काम करीत आहेत. महापालिकेच्या सहा विभागातील साडेपाचशे अंगणवाडी सेविका व मदतनीस या नाशिक मनपा क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी तसेच इतर रहिवासी क्षेत्रामध्ये वैद्यकीय विभागाचे पथकाबरोबर घरोघरी जाऊन कोरोना बाधित रुग्णांचे सर्वेक्षण व जनजागृतीचे कामकाज करत असल्याची माहिती उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.
जे रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन रुग्णांची चौकशी करत आहे, रूग्णांच्या संपर्कात असलेल्या अति जोखीम आणि कमी जोखमीच्या वर्गात असलेल्या बाधितांचे नातेवाईक आणि अन्य नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी करत आहे, कोरोना गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्या हातावर गृह विलगीकरणाचे तारखेसह नोंद करुन , हातावर शिक्के मारणे, रुग्णांच्या घरावर गृह विलगीकरणाबाबतचे स्टीकर्स लावणे, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची नियमित चौकशी करुन आवश्यकतेनुसार शहरी आरोग्य केंद्रांवरुन रुग्णांना औषधे, गोळ्या उपलब्ध करुन देणे, कोविड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे, तेथे नागरिकांना सुरक्षित अंतर राखून उभे राहणे, लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना अर्धा तास प्रतीक्षा गृहामध्ये बसविणे त्यांचे आरोग्याची चौकशी करणे इ. कामकाज करत आहे, असेही उपायुक्त तांबे यांनी सांगितले.