नाशिक : महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये यामागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. बंद पडलेल्या अंगणवाडी सेविकांनी मनपाच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोेषण सुरू केले आहे. बुधवारी (दि. १९) झालेल्या महासभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्येवर भर दिला. गेल्या महिन्याच्या महासभेत आदेश देऊनही प्रशासन याबाबत अंमलबजावणी करीत नसल्याने महासभेतील निर्णयांचा काय उपयोग, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अखेरीस महापौर रंजना भानसी यांनी अंगणवाडी सेविकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देतानाच गेल्या महासभेत ठरल्यानंतर पटसंख्येनुसार फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:51 AM