भगूर : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणे भगूरचे समाजसेवक सुधाकर ताजनपुरे यांनी देवदूताप्रमाणे दोघा पती-पत्नीचे विजेच्या धक्क्यातून प्राण वाचविले. भगूर कदम वाडा येथे भरत कन्हय्यालाल मंत्री (५३) हे पत्नी सविता (४९) हिच्यासह राहतात. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता भरत मंत्री यांनी नळाला पाणी आल्याने विद्युत मोटर सुरू करीत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंतींना ओलावा येऊन त्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने मंत्री यांना विजेचा धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करताच, त्यांच्या पत्नी घरातून पळत आल्या आणि त्यांनी भरत यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करताच, त्यांनादेखील विजेचा धक्का बसून त्याही चिकटल्या. दोघांनीही आरडाओरड केल्याने त्यांच्या शेजारीच राहणारे संरक्षण खात्यातील सेवानिवृत वायरमन सुधाकर गणपत ताजनपुरे धावतच मंत्री यांच्या घरात शिरले व क्षणाचीही उसंत न घेता, मंत्री यांची पॅँट धरून त्यांना ओढत कोरड्या जागेवर आणले. तोपर्यंत दोघे पती-पत्नी बेशुद्ध पडले होते. ताजनपुरे यांनी दोघांवर प्रथमोपचार केल्याने त्यांनी त्याला प्रतिसाद दिल्यावर तत्काळ दोघांना देवळाली कॅम्प कॅन्टोमेंन्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. ताजनपुरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने दोघा पती-पत्नीला जीवदान दिल्याबद्दल जयशिव क्रांती मित्रमंडळाने उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे यांच्या हस्ते ताजनपुरे यांचा सत्कार केला. ताजनपुरे हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असून, त्यांची समाजसेवक म्हणून ओळख आहे. घराच्या भिंतींना ओलावा येऊन त्यात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने मंत्री दाम्पत्यांंना विजेचा धक्का बसला. सुदैवाने ताजनपुरे मदतीला धावले आणि दोघांचे प्राण वाचले.
देवदूत बनून वाचविले दोघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:37 AM