नाशिक : शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या प्रभागात शनिवारी (दि.१३) जणू एखादी नदी अवतरली की काय? असेच चित्र पहावयास मिळाले. सोशलमिडियावर व्हायरल झालेल्या अशोकामार्गावर ठिकठिकाणी कमरेपेक्षा अधिक साचलेले पावसाचे पाणी बघून जणू या भागात अतीवृष्टी झाली असावी, असा संशय निर्माण होतो; मात्र अतिवृष्टी झाली नसली तरी दीड तास चाललेल्या मुसळधार पावसाने या भागाला संपुर्णपणे जलमय केले; कारण पावसाळी गटार योजनेचे झालेले तीनतेरा आणि नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.शहरात शनिवारी (दि.१३) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शहराचीच नव्हे तर महापौरांचा प्रभाग असलेल्या अशोकामार्ग, कुर्डुकरनगर, आदित्यनगर, जयदीपनगर, चिश्तिया कॉलनी, खोडेनगर, अक्सा कॉलनी, फातेमानगर या भागाचीसुध्दा दैनावस्था केली. शहरातील रस्त्यांप्रमाणेच या परिसरातदेखील अक्षरश: नैसर्गिक नाल्यांना पूर आला होता. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागात कुठल्याहीप्रकारे महपालिकेकडून पावसाळापुर्व कामे दर्जेदार पध्दतीने केली गेली नसल्यामुळे या भागात सर्वत्र पावसाचे पाण्याचे पाट वाहताना नजरेस पडले. मुख्य अशोकामार्गावरसुध्दा सहजरित्या बोट चालविता येऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली होती. यावरून महापालिका प्रशासनाच्या पावसाळापुर्व तयारीचा अंदाज बांधता येऊ शकतो. महापौरांच्या प्रभागातील परिसरात असे चित्र पहावयास मिळू शकते तर शहराच्या अन्य भागांची काय अवस्था झाली असेल? याची कल्पना न केलेली बरी.शुक्रवारपासून सलग दोन दिवस कोसळलेल्या मान्सूनच्या जोरदार सरींनी महापालिकेच्या पावसाळापुर्व कामांचा दर्जा नाशिककरांपुढे उघड केलाच; मात्र अजून पावसाळ्याचा हंगाम शिल्लक असून यापुढे तरी अशा पध्दतीने शहर पावसाच्या पाण्यात अन् गटारींच्या सांडपाण्यात बुडणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती ‘तजवीज’ होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.नागरिकांच्या घरांत शिरले पाणीमहापौरांचा प्रभागात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. कल्पतरूनगर, कुर्डूकरनगर, गणेशबाबानगर, आदित्य कॉलनी, हॅप्पी होम कॉलनी, सेक्रेड हार्ट शाळेचा परिसर, जयदीपनगर, खोडेनगर या भागात रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले की अक्षरक्ष: नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. एखाद्या झोपडपट्टीमध्ये जसे पावसाचे पाणी साचते तसेच काहीसे चित्र या भागात पहावयास मिळाले. कमरेइतके पाणी या भागातील मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलन्यांच्या अंतर्गत रस्त्यांवरून वाहत होते.