नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेली नाराजांची खदखद वाढतच असून, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा काही नाराजांनी थेट पक्ष प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याची चर्चा आहे. सुरगाणा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची छुपी युती चर्चेत आली आहे. याचीही तक्रार काही उमेदवारांनी अजित पवार यांच्याकडे करण्याची तयारी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या पत्नीने सुरगाणा तालुक्यातील भवाडा व गोंदुणे या दोन्ही गटातून माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर याच पदाधिकाऱ्याचा वाहनचालक असलेल्या कार्यकर्त्याच्या बहिणीला भवाडा गटातून राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी चर्चेत आहे. गोंदुणे गटातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पत्नी प्रिया प्रकाश वडजे यांनी पक्षाचे चिन्ह टिकण्यासाठी उमेदवारी केल्याचा दावा केला आहे. सुरगाणा तालुका माकपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र माकपला थांबविण्यासाठी सुरगाण्यात अनोखी छुपी युती आकाराला येत असल्याची चर्चा आहे. या छुपी युतीनुसार हट्टी गटातून भाजपाला, भवाडा गटातून शिवसेनेला तर गोेंदुणे गटातून राष्ट्रवादीला चाल देऊन माकप विरोधात आघाडी उभारण्याची खेळी उदयास येत असल्याची चर्चा आहे. हट्टी गटातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण उमेदवारी करीत असल्याने खासदारांनीच माकप विरोधात सर्वपक्षीय आघाडी उघडल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी काहीसे हिरमुसल्याची चर्चा आहे.
नाराजांची धाव थेट अजित पवारांकडे, नाराजी काढता काढता नाकीनऊ
By admin | Published: February 10, 2017 1:46 PM