नायगाव : गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षांनंतर सध्या कांदा पिकास उत्पादनाच्या खर्चावर अधिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांना नेहमीच स्वस्तात मिळणारा कांदा थोडाफार महाग झाल्याने लगेचच शहरी ग्राहकांना ओरड करण्यास वेळ मिळाला आहे. शेतकरीवर्ग सततच्या मातीमोल भावामुळे दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. कुटुंबाची घडी बसवण्यासाठी व मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी शहरी ग्राहकांना व शासनाला बळीराजाच्या डोळ्यामधील पाणी का दिसत नाही, असा संतप्त सवाल सध्या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. अनेक वर्षांनंतर सध्या कुठेतरी शेतकºयांना उत्पादन खर्च वजा जाता काही पैसे खिशात शिल्लक राहण्याइतका भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्व संकटांचा सामना करून पिकविलेल्या कांद्यास सध्या योग्य भाव मिळत असल्याचे ग्राहकांना व शेतकºयांच्या कष्टाचे मोजमाप न कळणाºया काही लोकांनी सध्या वाढत्या कांदा भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यातील पाणी दाखवून शहरी भागातील गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडल्याचे दाखवले जात आहे.शेतकºयांची नेहमी बदलणारे हवामान, अतिवृष्टी, पाणीटंचाई, तर कधी शासनाच्या धोरणामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती व त्यानंतर झालेली कुटुंबाची हेळसांड आदी सर्व गोष्टींबाबतीत फारसे दाखवले जात नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे भाव यांच्या पोटात दुखू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार वाढत्या कांदा भावाचे प्रसारण दाखवून शेतकºयांच्या सुखावर विरजण टाकण्याचे काम करणाºया प्रसारमाध्यमांच्या व शहरी ग्राहकांच्या वृत्तीबाबत शेतकरीवर्गात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाढत्या दराचा बाऊ केल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:16 AM